देवळा : तालुक्यातील खर्डा येथील कोलती नदीवर सीमेंट प्लग साखळी बंधाऱ्याचे झालेले काम स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आल्याने सदर बंधाऱ्याचे काम तोडून संबंधित ठेकेदारांकडून पूर्णपणे नवीन करून घ्यावे, असे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.मुख्यमंत्री निधीतून दुष्काळ निवारणार्थ जलसंधारण योजनेअंतर्गत देवळा तालुक्यात ४५ सीमेंट प्लग साखळी बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. खर्डा येथे कोलती नदीवर सदर योजनेतून सुमारे २७ लाखांचे काम नुकतेच करण्यात आलेले आहे.हे काम सुरू असतानाच ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार उपसरपंच भरत देवरे यांनी लघुपाटबंधारे स्थानिकस्तरचे शाखा अभियंता पाटील यांच्याकडे केली, मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही.खर्डा व परिसरात गत पाच वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असून, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई या भागात आहे. यामुळे येथील शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मोलमजुरी करण्यासाठी अन्यत्र जाण्याची वेळ या भागातील लोकांवर आलेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या भागात शासनामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.चालूवर्षी खर्डा व परिसरात नुकताच बऱ्यापैकी पाऊस पडल्याने कोलती नदीवर नुकत्याच बांधण्यात आलेला सीमेंट प्लग साखळी बंधारा पाण्याने भरला. यामुळे दुष्काळाने त्रस्त झालेल्या या परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने साठलेले सर्व पाणी बंधाऱ्यातून वाहून गेले. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले. देवळा येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर खर्डा येथील ग्रामस्थांनी बंधाऱ्याच्या कामाबाबत केलेल्या तक्रारींची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी टिकाव व फावड्याने बंधारा एका जागेवर फोडला असता तो सहज फुटला व आतून दगड, वाळू बाहेर आले. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.शासकीय निकषानुसार सदर काम करण्यात आलेले नसल्याचे निदर्शनास आल्याने हे काम संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा नवीन करून घ्यावे, असे आदेश आमदार कोतवाल यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच मुख्यमंत्री निधीतून दुष्काळ निवारणार्थ देवळा तालुक्यात झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला त्यांनी दिले आहेत.(वार्ताहर)
खर्डा येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट
By admin | Updated: July 24, 2014 01:03 IST