नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर भागात घरकुल योजनेत सदनिका मंजूर झाल्याची बतावणी करीत एका भामट्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली आहे. संशयिताने महापालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगून हा गंडा घातला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या शिवा गोसावी (वय २५, निळकंठ रो- हाउस, संजीवनगर, नाशिक) यांनी याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, गोसावी गुरुवारी (दि. २२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी एकट्या असताना काळ्या रंगाचा टी शर्ट व पॅट घातलेल्या भामट्याने त्यांना गाठत महापालिकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करीत घरकूल योजनेत तुमच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच घरातील मुख्य व्यक्तीचा मोबाइल नंबर द्या. त्यांच्याशी बोलून घेतो, असे सांगून सासऱ्याचा नंबर घेतला. याच नंबरवर सासऱ्याशी बोलत असल्याचे भासवून सासऱ्यांनी मंगळसूत्र द्यायला सांगितल्याचे खोटे बोलून सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र महिलेकडून घेतले. मंगळसूत्र हातात मिळताच संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात फिर्याद दिली असून, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.