----
फळ विक्रेत्यावर कोयत्याने वार
नाशिकरोड : महापालिका विभागीय कार्यालयाजवळील दुर्गा उद्यान भाजीबाजार येथे हातगाडी लावण्यावरून दोन फळ विक्रेत्यांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्या फळ विक्रेत्याच्या पाठीवर कोयत्याने वार करून त्यास जखमी केल्याची घटना घडली.
जुना ओढा रोड, भोर मळा येथे राहणारे फळ विक्रेता सलीम निजाम शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुर्गा उद्यानालगतच्या भाजीबाजाराबाहेर फळ विक्रीचे दुकान थाटलेले होते. वडनेर गेट येथील फळ विक्रेता दशरथ ठाकूर याने त्याची फळ विक्रीची हातगाडी सलीमच्या दुकानासमोर उभी केली. सलीमने ठाकूरला गाडी बाजूला करण्यास सांगितले. त्याचा मनात राग धरून ठाकूरला त्याने शिवीगाळ करत हातगाडीवरील कोयत्याने सलीमच्या पाठीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.