नाशिक : आदिवासी विकास विभागासमोर उपोषणास बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल (दि. ७) अकराव्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले. दरम्यान, येत्या तीन दिवसांत याबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यास या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नाशिक येथून वाडा येथे आदिवासी विकासमंत्र्यांच्या घरावर पायी दिंडी काढण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच महाराष्ट्र राज्य तासिका/मानधन शिक्षक स्त्री अधीक्षिका वर्ग-४ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्'ासह राज्यातील आमदारांना त्यांच्या मागण्यांबाबत पत्र देऊन येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याची मागणी केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभागासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आदिवासी विकास विभागाने आंदोलनकर्त्यांना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार लेखी पत्र दिले. मात्र त्या पत्रात काहीही ठोस निर्णय नसल्याने आंदोलनकर्त्यांनी पत्र स्वीकारण्यास नकार दिला. तसेच दहाव्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत आंदोलन कायम ठेवले होते. आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी गांधीगिरी करीत त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील काही आदिवासी आमदारांना पत्र पाठवून त्यांना येत्या सोमवार (दि.९) पासूनच्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली होती. काल अकराव्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याचे चित्र होते.(प्रतिनिधी)
आदिवासी विकास मंत्र्यांच्या घरावर दिंडी काढणार?
By admin | Updated: March 8, 2015 01:31 IST