वाइनचा साठा घेऊन वाहतूक करण्यासाठी निघालेली आयशर ट्रक चालकाच्या विसरभोळेपणामुळे कुठे उभी केली, हेच त्याला आठवत नसल्याने ट्रक मालकासह चालकाचेही धाबे दणाणले होते. त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी त्वरित अवघ्या दोन तासांत वाइन साठ्याने भरलेली ट्रक हुडकून काढली.
वाहन चालक पूनम लक्ष्मण पवार (५०, रा.सावतानगर, सिडको) यांनी निफाड तालुक्यातील विंचूर येथून वाइनची सुमारे १५ लाखांचा माल रविवारी (दि.१८) रात्री आयशर ट्रकमध्ये (एमएच १५ जीव्ही ८२८०) भरून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला, वाटेतच सिडको येथे पवार यांचे घर असल्याने त्यांनी रात्री घरी मुक्काम करत, पहाटे पुन्हा मुंबईच्या दिशेने वाहतूक करण्याचे ठरविले. यावेळी रात्रीच्या अंधारात त्यांनी ट्रक उभा केला. सकाळी उठल्यानंतर मात्र त्यांना ट्रक नेमका कुठे उभा केला, हेच त्यांना आठवत नव्हते. त्यांनी तत्काळ आयशर ट्रकचे मालक सुरेश उगले यांना दिली.
उगले यांनी तत्काळ सिडको येथे धाव घेत, चालकासोबत परिसरात शोधाशोध सुरू केला. अखेर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांना सगळा प्रकार कथन केला. गुन्हे शाेध पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी तत्काळ सहायक निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाला आदेश देत, ट्रकचे वर्णन व क्रमांकावरून शोध घेण्यास सांगितले. पोलीस नाईक रफिक शेख, राकेश निकम, पोलीस शिपाई नितीन सानप, अनिरुद्ध येवले, मुरली जाधव यांच्या पथकाने सिडको परिसरातील मोरवाडी ते पवननगर आणि सावतानगरचा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली.
--इन्फो--
पोलिसांनी परिसरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बघून गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सदर गाडी ही एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये खांडे मळा परिसराकडे जात असल्याचे दिसून आले. त्यावरून खांडे मळा परिसरात शोध घेतला असता, त्या ठिकाणी आयशर ट्रक आढळून आला. पोलिसांनी तत्काळ ट्रकमध्ये चढून वाइनचा साठा तपासला असता, सर्व साठा सुस्थितीत असल्याची खात्री पटताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याअगोदरच फक्त दोन तासांत आयशर ट्रक पोलीस ठाण्यात हजर करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ट्रक मालक उगले यांच्या हवाली ट्रक करण्यात आला.
(फोटो)
200721\521620nsk_84_20072021_13.jpg
हरविलेला ट्रक सापडला