नाशिक : नाशिकची पवित्र नदी असणाऱ्या गोदावरीच्या सुशोभिकरणासाठी देण्यात आलेल्या ५८ कोटी पाच लाख रुपयांच्या निधीचे नेमके काय झाले? असा प्रश्न गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी उपस्थित केला असून, या कामाचा लेखा-जोखा महापालिकेने जनतेसमोर मांडावा अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. प्रसिद्धीसाठी दिलेल्या नवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेला गोदावरी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट या नावाने ५८ कोटींचा निधी मिळाला आहे, परंतु त्यातून किती कामे झाली? किती निधी वापरला गेला? हे गूढच आहे. या निधीचा सुयोग्य वापर करण्यात आलेला नाही, तसेच कुठल्याही प्रकारचे विकासकाम दिसून येत नसल्याची तक्रार जानी यांची आहे. शहराच्या एकूणच विकासासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ११३३.४० कोटी निधीपैकी नाशिक सिटी डेव्हलपमेंट प्लान जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत कलम-८ प्रमाणे नाशिक शहरातील ऐतिहासिक ठिकाणांचे, तसेच गोदावरी सुशोभिकरणासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या कामांपैकी गोदावरीच्या सुशोभिकरणासाठी ७५ टक्के रक्कम वापरली गेली, तर ६९ टक्के काम पूर्ण झाल्याचे महापालिकेने केंद्र सरकारला लेखी दिले; परंतु ही कामे खरोखरच झाली का? असा प्रश्न जानी यांनी उपस्थित केला असून, हेरिटेज वोक, नदीकाठी संरक्षणासाठीच्या १७ कोटींचे, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या २३ कोटींचे, यात्रेकरूंच्या निवासस्थानासाठी असलेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीचे काय झाले? हा निधी किती खर्च झाला, किती कामे झाली? असा संशय त्यांनी पत्रकात व्यक्त केला आहे. या कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर सादर करावा अन्यथा उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा जानी यांनी दिला आहे.
गोदावरी सुशोभिकरणाच्या ५८ कोटींचे काय झाले?
By admin | Updated: December 3, 2015 23:57 IST