त्र्यंबकेश्वर : संसार करताना साधू-संतांच्या संगतीत राहून जीवनाचे कल्याण साधावे, असे प्रतिपादन वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष शिवनेरी येथील रामेश्वर महाराज शास्त्री यांनी केले. अंजनेरी येथील ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर यांच्या आश्रमात श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज यांच्या वारीनिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांचे कीर्तन झाले, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जीव, परमात्मा आणि साधूसंत असे तीन प्रकार या विश्वात आहेत. जिवाला विश्वात यावे लागते व उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करावे लागतात. याची त्याला कधी कधी चिंता असते, तर परमात्म्याला आणावे लागते. परमात्म्याला विश्वाचा उदरनिर्वाहाची चिंता असते, तर साधूसंतांना लोकांच्या जीवनाचा उद्धार करण्याची चिंता असते. माणूस हा संसारात बायको, मुलांकरिता सतत कष्ट करीत असतो. मुलांना शिकवून त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हे माता-पित्यांचे कर्तव्य असते. हे कर्तव्य पार पाडल्यानंतर स्वत:चे कल्याण साधण्यासाठी साधूसंतांच्या संगतीत, आश्रमाचा आधार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर यांच्या हस्ते रामेश्वर महाराज शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
संतांच्या संगतीत कल्याण साधावे
By admin | Updated: February 3, 2016 22:36 IST