लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘संत सज्जन सगळे नाचती गाती, मेळा भरवती सारखे चालती । कुणी छेडूनी विणा-टाळ हाती धरी, पायी चालतोया पंढरीची वारी।।’ असा मुखी गजर करत त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी निघालेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी (दि. १०) शहरात महापालिकेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.जुलै महिन्यात मंगळवार (दि. ४) पंढरपूर येथे साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीने शुक्रवारी (दि. ९) त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केल्यानंतर शनिवारी सकाळी पालखी शहरात दाखल झाली. त्र्यंबकरोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे उपमहापौर प्रथमेश गिते आणि सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पालखीचे स्वागत करण्यात येऊन पालखीतील विणेकरींना एलइडी लाइट असलेल्या रिचार्जेबल बॅटरी भेट देण्यात आल्या.यावेळी बोलताना संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे यांनी पालखीच्या संपूर्ण प्रवासाची माहिती देताना या पालखी सोहळ्याचे मंगळवार (दि. १३) सिन्नर, मंगळवार (दि. २०) अहमदनगर आणि बुधवार (दि. २८) सोलापूर याठिकाणी रिंगण सोहळे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती दिली.
संत निवृत्तिनाथ पालखीचे स्वागत
By admin | Updated: June 11, 2017 00:44 IST