मेशी : मेशीसह परिसरात गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान घटत असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व बिघडलेल्या हवामानाचा फटका बसत असल्यामुळे परिसरातील डाळींबबागा नामशेष झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी बागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याही शेवटच्या घटका मोजत आहेत. एकेकाळी नगदी पीक म्हणून डाळींबबागांकडे पाहिले जायचे; मात्र घटते पर्जन्यमान, बिघडलेले हवामान व अफाट खर्च करूनही पदरी निराशाच येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी डाळींबबागा काढून टाकणे पसंत केले. कारण महागडी औषधे फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नाही अन् आलीच तर ऐनक्षणी निसर्गाचा लहरीपणा आडवा येतो अन् डाळींबबागा उद्ध्वस्त करतो. या भागात कांदा पिकविणेही कठीण झाले आहे. अशावेळी डाळिंबासारखे नाजूक पीक घेणे अधिकच कठीण होते. एकेकाळी या परिसरात डाळींबबागांचे मोठे पेव आले होते. परंतु आता क्वचितच बागा दिसत आहेत. बाजारभावही स्थिर नसतो. सध्या बारमाही हवामान खराब असते. ऋतुमानात समतोल राहिलेला नाही. कधी धुके, बेमोसमी पाऊस, गारपीट, ढगाळ हवामान हे नेहमीचेच पाचविला पुजलेले आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा धास्तावलेला आहे. यावर्षी रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन घटणार आहे. गहू, हरभरा, कांदा अगदीच नगण्य स्वरूपात पिकणार आहे. अन्नधान्यातील रब्बी हंगामातील गहू हे पीकसुद्धा दुर्मीळ झाले आहे. (वार्ताहर)
डाळींबबागा पाण्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Updated: February 9, 2016 22:39 IST