आझादनगर (मालेगाव) : गिरणा धरणातून मालेगाव शहरासाठी पाणी आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांनी नाशिक व जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी १ वाजता गिरणा धरणाजवळील विश्रामगृहात बंद दरवाजा बैठक घेतली. मात्र दोन तास चाललेल्या बैठकीत मालेगाव शहरासाठीचा पाणीप्रश्न अनुत्तरितच राहिला. पाचोऱ्यासाठी फेब्रुवारीमध्ये एक आवर्तन सोडण्याचे निश्चित करण्यात आले. उर्वरितांना ‘पाणी जपून वापरा’चा संदेश विभागीय आयुक्तांनी दिला.जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय आणि नाशिक जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाहसह सर्व अधिकारी गिरणा धरण येथे दाखल झाले होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवले ११ वाजता पोहचले. पंधरा-वीस मिनिटांच्या चर्चेनंतर विभागीय आयुक्त व दोन्ही जिल्हाधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांनी सर्वप्रथम नांदगाव ५६ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा उद्धरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अनुक्रमे चाळीसगाव, मालेगाव व दहिवाळ पाणीपुरवठा केंद्राची पाहणी करून माहिती घेतली.चणकापूर, केळझर, पुनंद व हरणबारी या चारही धरणांपैकी एकाही धरणाचे पाणी गिरणा धरणास मिळू शकणार नाही. किंबहुना सोडले तरी पाणी गिरणा धरणापर्यंत पोहचणे शक्य नाही. त्यामुळे गिरणा धरणातील शिल्लक ८७२ दलघफू जिवंत साठ्यातून जळगाव जिल्ह्यासाठी ७५० दलघफू पाणी आवर्तनद्वारे सोडून पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यात आला. परंतु मालेगाव व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी धरणातील मृत पाणीसाठा उचलण्याशिवाय समोर पर्याय नसल्याचे यातून निष्पन्न होत आहे.बैठकीस मालेगावचे अपर जिल्हाधिकारी स्वामी, प्रांत अजय मोरे, तहसीलदार सुरेश कोळी, चाळीसगावचे प्रांत घोडेपाटील, म. जीवन प्राधिकरणचे अभियंता जयवंत खरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, पाचोरा तहसीलदार दीपक पाटील, पाटबंधारे विभागाचे जिरे यांच्यासह महसूल व संबंधित विभागाचे सर्वच अधिकारी उपस्थित होते. आजची बैठक गिरणा धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून मालेगाव येथील विश्रामगृह येथे घेण्यात येणार होती; परंतु रात्री उशिरा नियोजनात बदल करीत गिरणा धरणावरच बैठक घेण्याचे ठरले. बैठक सभागृहात घेण्यात आली. यामुळे संबंधित यंत्रणेकडून बैठकीतील घडामोडीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. (वार्ताहर)
मालेगाव शहराचा पाणीप्रश्न अनुत्तरित
By admin | Updated: December 4, 2015 00:13 IST