चांदवड : पुणेगाव धरणाचे पुणेगाव डाव्या कालव्यास आज (दि.१०) सकाळी ८ वाजता पाणी सोडण्यात आले. अल्प पावसामुळे शेतकऱ्यांची शेत पिके धोक्यात आली होती. त्यामुळे पुणेगाव डाव्या कालव्यास पुणेगाव धरणातून पाणी सोडण्याची मागणी आमदार शिरीष कोतवाल यांनी दि. १ सप्टेंबर रोजी अधीक्षक अभियंता, प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिकचे कार्यकारी अभियंंता पालखेड, पाटबंधारे विभाग नाशिक कार्यकारी अभियंता-कडवा कालवा विभाग नाशिक व उपअभियंता ओझरखेड कालवा उपविभाग क्रमांक २, पिंपळगाव (बसवंत) यांच्याकडे पत्रान्वये केली होती. त्यानुसार पुणेगाव प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण कालव्याची चाचणी शेवटच्या टोकापर्यंत करण्याची मागणी केली होती. आमदार कोतवाल यांच्या प्रयत्नांमुळे पुणेगाव डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चांदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना या पाण्याचा लाभ होणार आहे, तर टंचाई निवारण्यास मदत होणार आहे. पुणेगाव कालव्यास पाणी सोडल्यामुळे जनावरांना चारा, पाणी तसेच शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. (वार्ताहर)
पुणेगाव धरणाचे डाव्या कालव्यास पाणी सोडले
By admin | Updated: September 11, 2014 00:30 IST