नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपलेल्या आर्थिक वर्षात राज्य सरकारने आणखी ३१० कोटी रुपयांची तरतूद केली असून, सदरचा निधी नगरपालिका संचालकांकडे वर्ग करण्यात आल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या केल्या जाणाऱ्या कामांचा ७५ टक्के बोझा राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यानुसार महापालिकेला अजून सव्वातीनशे कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे. ३१ मार्च रोजी शासनाकडून हा निधी वितरीत केला जाईल अशी अटकळ बांधली जात होती, परंतु शासनाने तशी घोषणा केली नाही. मात्र, नगरविकास विभागाने ३१० कोटी रुपयांचा निधी नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या नगरपालिका संचालकांकडे वर्ग करण्यात आला आहे. नगरपालिका संचालकांच्या देखरेखीखाली या निधीचे वितरण व नियंत्रण करण्यात येणार आहे. ज्या ज्या यंत्रणांनी आजवर केलेल्या कामांचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर केले असेल त्यांना प्राधान्याने निधीचे वितरण केले जाणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून या व्यतिरिक्त आणखी अडीचशे कोटी रुपये अपेक्षित असून, त्याबाबतचा पाठपुरावा केला जात आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेला अजून सव्वातीनशे कोटी रुपयांची प्रतीक्षा
By admin | Updated: April 5, 2015 00:45 IST