आदिवासी विभागाच्या वतीने राज्यभरात आश्रमशाळा आणि वसतिगृह चालविली जातात. या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शालेय साहित्य व लेखनसामग्री, अंथरुण, पांघरुणसह विविध वस्तूंसाठी रोख रक्कम दिली जाते. इ. चौथीसाठी ७५०० , इ.नववीसाठी ८५०० आणि बारावीसाठी ९५०० रुपये याप्रमाणे डीबीटीव्दारे रक्कम अदा केली जाते. आदिवासी आयुक्तस्तरावरून ही कार्यवाही होत असून, संपूर्ण रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सुमारे ९८ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील पैसे मात्र अद्याप दिले गेलेले नाहीत. दरम्यान याबाबतची कार्यवाही सुरू असून, ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांची माहिती अपडेट झाल्यानंतर पुढील महिन्यात याचे वाटप सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चौकट-
पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू
शिक्षण सेतू अभियानांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येत असून, त्याची कार्यवाही सुरू आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाकडून जसजसा पाठ्यपुस्तकांचा कोटा उपलब्ध होतो त्यानुसार शाळास्तरावर शिक्षकांमार्फत त्याचे वाटप करण्यात येत आहे.
चौकट-
या वस्तूंसाठी मिळते डीबीटीमार्फत रक्कम
अंघोळीचा आणि कपडे धुण्याचा साबण, खोबरेल तेल, टुथपेस्ट, टुथब्रश, कंगवा, नेलकटर, वह्या, रजिस्टर, कंपासपेटी, बॉलपेन, फुटपट्टी, गणवेश, पी.टी. ड्रेस, नाइट ड्रेस, अंडर गारमेंट, वुलन स्वेटर, टॉवेल, शाळेचे बुट, पायमोजे, अंथरुण-पांघरुण. मुलांना वर्षभरासाठी लागणाऱ्या या वस्तूंचा अंदाज घेऊन यासाठीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. वाढती महागाई लक्षात घेता शासनाकडून देण्यात येणाऱ्या रकमेत या सर्व वस्तू खरेदी करणे शक्य होत नसल्याने या रकमेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.