नाशिक : फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रासमोर अंधश्रद्धा, धार्मिक वाद, जात पंचायती, भाषावाद ही आव्हाने असून, याविरोधात सर्वांनी एकत्रित आवाज उठविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले़ छात्रभारती युवा संघर्ष समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ़ नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेत ‘पुरोगामी महाराष्ट्राची सद्य:स्थिती आणि पुढील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते़ परशुराम सायखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात बोलताना वागळे म्हणाले की, राज्य सरकारने जादूटोणा विरोधी कायदा हा ऐतिहासिक कायदा तयार केला आहे़ अंधश्रद्धेविरोधात लोकशाही व अहिसेंच्या तत्त्वाने अठरा वर्षे लढा देणारे डॉ़दाभोळकर हयात असताना सरकारने हा कायदा केला नाही. त्यांचा खून झाल्यानंतर पश्चाताप म्हणून हा कायदा करण्यात आला़ अंधश्रद्धेला राजकीय, सामाजिक, आर्थिक, लैंगिक बाजूदेखील आहे़ या कायद्यानंतरही अंधश्रद्धेचे विविध प्रकार सुरूच आहेत़ कुठे टमाटा बाबा, मंतरलेले पाणी, तर कुठे नरबळीच्या घटना घडतच आहेत़ सोळा महिन्यांनंतरही दाभोळकरांचे खुनी सापडत नाहीत ही शरमेची बाब आहे़ डॉ़ दाभोळकरांचे काम त्यांचे विवेकवादी विचार संपूर्ण महाराष्ट्रात पसरवून खुन्यांना धडा शिकविला पाहिजे़ प्रास्ताविक प्रियदर्शन भारतीय यांनी केले़ स्वागत सचिन मालेगावकर यांनी, तर सूत्रसंचालन प्रसाद देशमुख यांनी केले़ यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसह, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
धार्मिक,व भाषावादाची महाराष्ट्रासमोर आव्हानेविवेक व्याख्यानमालेत वागळे यांचे प्रतिपादन
By admin | Updated: December 21, 2014 00:45 IST