नाशिक : देवळाली परिसरातील जमीन फ सवणूक प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी १६ जुलैला अटकपूर्व जामिनाच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी दिले आहेत़ अंतरिम अटकपूर्व जामिनाच्या वेळी वाडकर यांनी हजर राहावे, या सरकारी वकिलांच्या अर्जावर शुक्रवारी न्यायालयाने हा आदेश दिला़देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर ७/१३ येथील ७७ आर जमीन खरेदीचे हे प्रकरण आहे़ भागीदारीत घेतलेल्या या जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर व विजया करंदीकर या दोघांना हाताशी धरून ७ फेब्रुवारी २०१३ रोजी वादात सापडलेली मिळकत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी स्वत:च्या नावे लिहून घेतली, अशी तक्रार हेमंत कोठीकर यांनी न्यायालयाकडे केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार २५ जूनला भद्रकाली पोलीस ठाण्यात फ सवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़या प्रकरणात सुरेश वाडकर यांनी वकिलामार्फत २८ जूनला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर ८ जुलैला यावर सुनावणी ठेवण्यात आली होती़ या दिवशी भद्रकाली पोलिसांनी जबाब घेण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितल्याने न्यायालयाने वेळ दिला होता़ तसेच या कालावधीत संबंधित न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ११ जुलैला वाडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली होती़ दरम्यान, शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांच्या न्यायालयात सुरेश वाडकर यांनी अटकपूर्व जामिनाच्या वेळी न्यायालयात हजर रहावे, असा अर्ज जिल्हा सरकारी वकील यांनी दिला़ हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, त्यानुसार सुरेश वाडकर यांना १६ जुलैला न्यायालयात हजर रहावे लागणार आहे़ (प्रतिनिधी)
वाडकर हाजीर हो़़़
By admin | Updated: July 12, 2014 00:29 IST