इंदिरानगर : मूल होत नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणात संतप्त पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास घडली़ खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव सुरेखा जिवाजी पहाडे (२८, सावित्रीबाई फुलेनगर, वडाळागाव मूळ राहणार परभणी) असे आहे़ याप्रकरणी पती जिवाजी पहाडे यास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागावातील सावित्रीबाई फुलेनगरमध्ये राहणारे जिवाजी पहाडे व सुरेखा पहाडे या दाम्पत्याचे सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जोरदार भांडण झाले़ या भांडणात संतप्त झालेल्या जिवाजीने पत्नी सुरेखाच्या पोटात चाकू खुपसला़ यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने जिवाजीच्या भावाने जखमी सुरेखाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला़ दरम्यान, वडाळागावात राहून मोलमजुरी करणाऱ्या जिवाजी व सुरेखा पहाडे यांचा १३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मूलबाळ होत नसल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात महिलेचा पती जिवाजी भुजंग पहाडे (३२) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)
वडाळागावात पत्नीचा चाकूने भोसकून खून
By admin | Updated: April 11, 2017 01:12 IST