जायखेडा : बागलाण तालुक्यातील नांदीन येथील पिसोळ किल्ला परिसरातून जनावरे चोरून नेणाऱ्या सहा महिला व एका पुरुषाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून जायखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यातील तीन भामटे संधी साधून जंगलात फरार झाले. याप्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या नांदीन व परिसरातील शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे चरण्यासाठी पिसोळ किल्ल्यावर सोडली आहेत. पिसोळ किल्ला परिसरातून दहा महिला पुरुष फासेपारधी शेतकऱ्यांनी चारायला सोडलेल्या जनावरांपैकी चार ते पाच गायी व गोऱ्हे चोरून नेण्याच्या बेतात असताना भाऊसाहेब महाराज, अभिमन सोनवने, दीपक शिंदे या तरुणांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ नांदीनचे सरपंच अमित पवार तसेच रमेश शिंदे, कौतिक पवार, अशोक मोहिते, दीपक शिंदे आदिंसह आपल्या सहकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून कळविले व मीनाक्षी पवार, संनती चव्हाण, वसंतूबाई पवार, निर्मलाबाई पवार, यारेलाठ चव्हाण, जोत्स्नाबाई चव्हाण, अजंगसिंह राठोड, राठोड आप्पा भोसले (अजनाळे), यंकेश अजनसिंह पवार (जामदे), इनकरी साहेबसिंह चव्हाण (जामदे) या चोरट्यांना गुरांसह पकडून ठेवले.दरम्यान, संधीचा फायदा घेत राठोड आप्पा भोसले, यंकेश अजनसिंह पवार, इनकरी साहबसिंह चव्हाण हे तिघे जंगलात पळून जाण्यास यशस्वी झाले. उर्वरित सहा महिलांसह एका पुरुषास जायखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवलदार गर्दे करीत आहेत.(वार्ताहर)
जनावरे चोरणारी टोळी ग्रामस्थांनी पकडली
By admin | Updated: September 14, 2016 21:50 IST