नाशिक : जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत एकूण १३४ अपक्ष उमेदवारांनी आपले राजकीय भवितव्य आजमावले. अपक्ष उमेदवारांची संख्या तीन आकडी असली तरी यापैकी केवळ आठच अपक्ष उमेदवार विजय मिळवू शकले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी झाल्यानंतर अनेक धक्कादायक निकाल लागले. या निकालांमुळे तालुका तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असल्याचे दिसून आले. राज्यात शिवसेना, भाजपा युतीचे सरकार असल्यामुळे महापालिकांप्रमाणेच पंचायत समिती निवडणुकीसाठी या पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. काहींनी तर पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळेल या विश्वासाने निवडणुकीपूर्वीच गणात संपर्क दौरे सुरू केले होते, मात्र ऐनवेळी काहींची उमेदवारी नाकारली गेल्याने त्यांचा हिरमोड झाला. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने काहींनी थांबने पसंत केले तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. याशिवाय इतरही स्वयंघोषित नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली गेली. अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या १५ गणांमधील एकूण १३४ उमेदवारांपैकी केवळ आठ जणांना मतदारांनी पंचायत समित्यांमध्ये पोहोचविले. या आठ जणांमध्ये पंडित चैत्राम अहिरे मानूर गण, ता.सटाणा, केदूबाई राजू सोनवणे पठावे दिगर गण, उत्तम बाजीराव जाधव, अहिवंतवाडी गण, ता.दिंडोरी, नितीन प्रभाकर जाधव, ओझरटाऊनशिप गण, नितीन सीताराम पवार, ओझर गण, गुरुदेव द्वारकानाथ कांदे, खेडलेझुंगे गण (तीनही ता. निफाड), मोतीराम किसन दिवे, वाघेरा गण, ता. त्र्यंबकेश्वर, विजय जगताप एकलहरे गण, ता. नाशिक यांचा समावेश आहे. अपक्ष म्हणून आपले राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या अनेक उमेदवारांना मिळालेली मते पाहाता अनेकांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. ५० अपक्षांना चार आकडीत, तर ७२ जणांना तिहेरी संख्येत मते मिळाली. सहा जणांना तर केवळ दोन अंकी मतांच्या संख्येवर समाधान मानावे लागले. दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम गणातील अपक्ष उमेदवार बापुराव पांडुरंग मालसाने यांना तर संपूर्ण गणातून केवळ ३० मते मिळाली आहेत. (प्रतिनिधी)मालेगाव : २० अपक्ष होते रिंगणातअपक्ष उमेदवारांसाठी सर्वाधिक संख्या मालेगाव तालुक्यात (२०) होती. सर्वात कमी संख्या पेठ तालुक्यात (१) होती. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या निफाड तालुक्यात तीन गणांमध्ये अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्याखालोखाल सटाणा तालुका असून, येथे दोन गणांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यात एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविणाऱ्या जिल्ह्यातील त्या एकमेव उमेदवार आहेत.
केवळ आठ अपक्षांना विजयश्री
By admin | Updated: February 26, 2017 00:35 IST