नाशिक : शनिवारी दुसऱ्या दिवशीही वादळी वारा व विजेचा कडकडाट करीत दुपारनंतर हजेरी लावलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत तर केलेच, परंतु नाशिक व निफाड येथे वीज कोसळून दोघांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. गेल्या २४ तासात जि'ात १३१ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. निफाड तालुक्यातील शिंगवे येथील माजी सरपंच वाळू देवराम मोगल (५४) हे घरात दूरदर्शनवर कार्यक्रम पाहत असतानाच जोरदार आवाज करीत वीज घरावर पडली व त्यात मोगल हे जागीच ठार झाले. शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा वाढला होता, परंतु अचानक दुपारी तीन वाजेनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन सर्वत्र अंधारल्याची परिस्थिती निर्माण झाली व थोड्याच वेळात विजेचा कडकडाट करीत पावसाचे आगमन झाले. त्यामुळे नागरिकांची पावसापासून बचावासाठी धांदल उडाली. जवळपास दीड तास चाललेल्या या पावसामुळे सायंकाळी साडेपाच वाजताच रात्रीचा अंधार पडल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली. शहरा प्रमाणेच ग्रामीणमध्येही दुपारपासून पावसाने हजेरी लावली. त्यातूनच नाशिक तालुक्यातील नाणेगाव येथे गिरीधर लक्ष्मण भरसट (३५) या मूळ पेठ येथे राहणाऱ्या मजुराच्या अंगावर वीज पडून तो जागीच मृत्यू पावला.त्यास उपचारासाठी कॅन्टोमेंट रूग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. गिरीधर हे मुळचे पेठ तालुक्यातील घोटीविरा येथील रहिवासी होत. दोनवाडे येथेही वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसातच वीज पडून नंदू गायकवाड हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे ग्रामीण भागात काही प्रमाणात पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, प्रत्यक्षात रब्बीला याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. युवक जखमीदेवळाली कॅम्प : दोनवाडे येथे दुपारी वीज पडून १८ वर्षाचा युवक जखमी झाला आहे. दोनवाडे येथील मुकुंदा नंदु गांगुर्डे हा युवक गुरे चरत असतांना त्याच्या अंगावर वीज पडून जखमी झाला. त्याला त्याचे वडील नंदु गांगुर्डे यांनी भगूर येथील खाजगी रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)
दुसऱ्या दिवशीही दोघांचे बळी
By admin | Updated: October 4, 2015 00:09 IST