बाधितांनी एकाच दिवसात ओलांडला दीड हजारांचा टप्पा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 12:12 AM2021-03-14T00:12:46+5:302021-03-14T00:13:10+5:30
नाशिक : कोरोना रुग्णांचा विस्फोट सलग चौथ्या दिवशीही कायम असून, शनिवारी (दि.१३) एका दिवसात तब्बल १,५२२ रुग्णबाधित आढळून आले आहेत. तब्बल दीड हजारांवर नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.
नाशिक : कोरोना रुग्णांचा विस्फोट सलग चौथ्या दिवशीही कायम असून, शनिवारी (दि.१३) एका दिवसात तब्बल १,५२२ रुग्णबाधित आढळून आले आहेत. तब्बल दीड हजारांवर नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.
६८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नाशिक ग्रामीणमधून १, मालेगाव मनपा क्षेत्रातून १ असे एकूण २ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१६८ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात शनिवारी बाधितांच्या आकड्याने गत सहा महिन्यांतील सर्वांत मोठी मजल गाठल्याने सर्व उपाययोजना अधिक कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात बुधवारी बाधितांचा आकडा १,३३०पर्यंत, गुरुवारी १,१४०पर्यंत, तर शुक्रवारी १,१३५वर गेल्याने कोरोनाचा ग्राफ कमी होण्याची शक्यता वाटू लागली. मात्र शनिवारी बाधित संख्या थेट १,५२२ वर पोहोचल्याने अजून बाधित संख्या किती प्रमाणात वाढेल, त्याचा अंदाज यंत्रणेलादेखील येईनासा झाला आहे. आरोग्य विभागासह प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात सलग चार दिवस बाधित आढळण्याची बाब चिंताजनक असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीनेदेखील नागरिकांना आता कठोर इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३२ हजार २३४ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख २२ हजार ८४९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ७,२१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९२.९० वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९२.४३, नाशिक ग्रामीण ९४.७५, मालेगाव शहरात ८७.९८, तर जिल्हाबाह्य ९२.२२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ७६ हजार ८२१ असून, त्यातील चार लाख ४१ हजार ७६५ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख ३२ हजार २३४ रुग्णबाधित आढळून आले आहेत, तर २,८२२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
उपचारार्थी संख्या सात हजारांवर
नवीन रुग्णसंख्येत झालेली मोठी वाढ झाल्याने महानगरातील उपचारार्थी रुग्णांची संख्या सात हजाराचा टप्पा ओलांडून गेली आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या या वाढीमुळे. उपचारार्थी रुग्णसंख्या ७,२१७ वर पोहोचली आहे. त्यामुळे बाधितांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील वाढता आकडा बघून जिल्हाभरातील बंद करण्यात आलेली अनेक कोरोना सेंटर्स, तपासणी केंद्रे पुन्हा सुरू करावी लागणार आहेत.