नाशिक : प्रथम शिक्षण, शिक्षण झाल्यावर नोकरी, मग लग्न आणि संसार या पारंपरिक चौकडीतून बाहेर येत तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे, असे प्रतिपादन उद्योजक के. वेंकटेसन यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित डिपेक्स २०१५ या प्रदर्शनाचे उद््घाटन करताना ते बोलत होते. ते म्हणाले पूर्वीपासून इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरी करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. पालकही त्यांना आधी पदवी घ्या, नंतर बाकीचे बघू अशी भूमिका मुलांबाबत घेतात. परंतु मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू दिल्यास त्यांची नक्की प्रगती होते. यासाठी वेंकटेसन यांनी यशाची त्रिसूत्री उपस्थित विद्यार्थ्यांना दिली आणि ग्राहकाभिमुख वस्तुंचे उत्पादन करून मागणीनुसार त्याचे वितरण करा, असा सल्ला देत डिपेक्समधून यश्स्वी उद्योजक व्हा, असे आवाहन केले. कोणतेही कार्य करताना अपयश आल्यास नाराज होऊ नका, त्यासाठी मनाचा निग्रह ठेवा, असे सांगतानाच अपयशाने माणूस जमिनीवर राहतो तर कायम यशस्वी होणाऱ्या माणसात कुठेतरी अहंपणा बळावतो हा माझा अनुभव आहे. मेक इन इंडियासाठीही काही सूचना करताना वेंकटेसन यांनी प्रथम शासनाने त्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, देशातील नागरिकांनीही परदेशी उत्पादन वापरण्यापेक्षा त्याचा वापर करावा आणि उद्योजकांनी आयात केलेल्या वस्तूंवर त्यासाठी अवलंबून राहू नये अशा सूचना केल्या.
युवकांनी उद्योजकतेला प्राधान्य द्यावे वेंकटेसन : डिपेक्स २०१५ प्रदर्शनाचे उद््घाटन
By admin | Updated: March 8, 2015 01:03 IST