सिडको : जुने सिडको येथील रस्त्यालगत अतिक्रमण करून भरत असलेल्या भाजीबाजारातील विक्रेत्यांकडून खराब झालेला भाजीपाला तिथेच टाकण्यात येत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. याबाबत अनेकदा सांगूनही जाग येत नसल्याने मनपाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जुने सिडको शॉपिंग सेंटर येथील रस्त्यालगत भाजीपाला व्यावसायिक व्यवसाय करतात. रोज सकाळी भरणाऱ्या भाजीबाजारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, अंतर्गत रस्त्याबरोबरच मुख्य रस्त्यावरदेखील फळविक्रेते व्यवसाय करीत असल्याने रहदारीसही अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहे. भाजीपाला व्यावसायिक त्यांचा भाजीपाला विकून झाला की उरलेला व खराब झालेला भाजीपाला तिथेच टाकतात. सध्या पावसाळा असल्याने पावसाच्या पाण्यात फेक लेला भाजीपाला सडून जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. दुपारनंतर या ठिकाणी सर्वत्र घाण व कचरा साचलेला असतो. मनपा प्रशासनास याबाबत वारंवार सांगूनही योग्य दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत आज परिसरातील नागरिकांनी नगरसेवक कल्पना पांडे यांना सांगितल्यानंतर त्यांनी याठिकाणी पाहणी केली व परिस्थितीची पाहणी केली. यावेळी भाजीपाला व्यवसाय करण्याच्या ठिकाणी घाण व कचरा साचलेला होता, तसेच दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना तोंडावर रुमाल घेऊनच जावे लागले. सिडको परसरात डेंग्यूसदृश आजाराची रुग्णसंख्या अधिक असताना याबाबत मनपा प्रशासन व आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
भाजीबाजार परिसर झाला कचऱ्याचे आगर
By admin | Updated: July 30, 2016 01:06 IST