संदीप झिरवाळ : नाशिकसंपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या काहिलीने भाजून निघत असतानाच नाशिक मध्येही तपमानाने चाळिशी ओलांडली आहे. भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्याला या उन्हाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह अन्य उपनगरांत फळे व पालेभाज्यांचा पुरवठा करणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक उन्हामुळे घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सूर्य आग ओकत आहे. अनेक शहरांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर जाऊन पोहोचला आहे. वाढत्या उष्म्याचा परिणाम जिल्ह्यातील फळ व भाजीपाला पिकांवरही जाणवू लागला आहे. उन्हामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने काही दिवसांपासून शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने जवळपास ७० टक्के शेतमालाची आवक घटली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईसह वापी, वाशिम, व अन्य उपनगरांत दैनंदिन १०० ते १२५ वाहने भरून शेतमाल जात असतो. बाजार समितीत वांगी, टमाटा, फ्लॉवर, कोबी, भोपळा, ढोबळी मिरची, कारले, दोडका, भेंडी, गिलके या फळभाज्यांची आवक होत आहे. यात वांगी, टमाटा, फ्लॉवर, कोबी या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभाव मध्यम आहेत. तर भेंडी, गवार, गिलके, कारले, दोडका या फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. भाजीबाजारात भेंडी ५० ते ६०, गवार ८० रुपये किलो, दोडका ४०, गिलके ४० तर कारले ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांना दोनवेळचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.
भाजीपाला पिकाला उन्हाचा तडाखा
By admin | Updated: March 30, 2017 00:35 IST