नाशिक : केटीएचएम महाविद्यालयातील वेदांत उमेश मुंदडा यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या ‘ राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील विविध सुवर्ण पदकांची घोषणा करण्यात आली असून यात वेदांतची सुवर्ण पदकासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
अवघा दीड वर्षाचा असतानाच वेदांतची दृष्टी हरविल्यानंतरही यशाची शिखरे पादाक्रांत करायला निघालेल्या वेदांतने ने दहावी, बारावी आणि बी. कॉमच्या पदवी परीक्षेतही देदीप्यमान यश संपादन करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता त्याने एम.कॉमच्या प्रथम वर्षात शिकताना विविध क्षेत्रातील विषयांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण , स्पर्धा, सामाजिक काम करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेही लक्ष वेधून घेतले असून विद्यापीठाने त्याची राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदकासाठी निवड केली आहे. त्याला विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात हे पदक प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, वेदांतला हा पुरस्कार मिळणे महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असून अन्य दिव्यांग विद्यार्थ्यांनाही वेदांतपासून निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास केटीएचएम महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
(आरफोटो- २९ वेदांत मुंदडा)