वटार : गेल्या सप्ताहात हत्ती नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे मका, बाजरी, डाळींब पिकांमध्ये पाणी घुसल्याने पिके भुईसपाट झाली आहेत. नदीलगत असलेली स्मशानभूमीच अखेरचा श्वास घेत आहे. पुरामुळे स्मशानभूमीची खालच्या बाजूचे बांधकाम पूर पाण्यात वाहून गेल्याने अर्धेच बांधकाम राहिले आहे. रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने स्मशानभूमी पुरात कोणत्याही क्षणी वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नदीलगतचे शेकडो एकर क्षेत्र पुराच्या पाण्याने बाधित झाल्याने बळीराजाचे पुराने कंबर मोडले असून, १९६९च्या आठवणींना उजाला देत एकीकडे आनंद, तर दुसरीकडे दु:ख अशी परिस्थिती परिसरात झाली आहे. परिसरात कोबी, मका, बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांचे शेतीचे वाळवंट झाले असून, शेतीमध्ये पूरपाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील हत्ती नदीलगतचे शेकडो एकर क्षेत्र पुराने बाधित झाले आहे. काही शेतकऱ्यांचे शेतीपंप, विहिरींमध्ये पाणी घुसल्याने नदीलगतच्या शेतकऱ्यांची मोठी वित्तहानी झाली आहे. (वार्ताहर)
वटार : स्मशानभूमीच घेतेय अखेरचा श्वास;
By admin | Updated: August 9, 2016 22:26 IST