नाशिक : मनसेतील घडामोडींमुळे नाराज असलेल्या आमदार वसंत गिते यांनी रविवारी राज यांच्या दौऱ्यात गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे गैरहजर राहिल्याचा दावा केला होता. त्यानंतर गिते यांच्यावर आज शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर राज हे स्वत: रुग्णालयात भेटण्यास गेले. त्यामुळे नाशिकमधील मनसे समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मनसेतील फेरबदल आणि सूत्रे थेट मुंबईस्थित नेत्यांकडे सोपवल्याने पक्षाचे नाशिकमधील प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते अस्वस्थ होते. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीनंतरदेखील ते रामायण येथे फिरकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेची चर्चा होत असतानाच, रविवारी राज यांच्या नाशिक दौऱ्यात गिते यांनीच नव्हे, तर समर्थकांनी अनुपस्थिती दर्शविली होती. गिते यांची समजूत काढण्यासाठी नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर आणि दीपक पायगुडे यांनी त्यांचे घर गाठले आणि नंतर गिते यांनी शासकीय विश्रामगृहात राज यांची भेट घेतली होती. यावेळी गिते यांनी गुडघ्याला दुखापत झाल्याचे सांगितल्यानंतर गिते यांनीच मुंबईतील डॉ. लाड यांची वेळ घेतली होती. त्यानुसार गिते यांनी काल भेट घेतल्यानंतर आज डॉ. अनंत जोशी यांनी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर राज यांनी भेट घेतली आणि विचारपूस केली. (प्रतिनिधी)