नाशिकरोड : परिसरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विहितगाव येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त पहाटे मूर्तीला महाअभिषेक करून काकड भजन होणार आहे. त्यानंतर मनपा उद्यान विभाग व मंदिराचे विश्वस्त यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी काढून गावात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता हभप हर्षद गोळेसर, सुदाम धोंगडे व दिनेश मोजाड हे संगीत भजन सादर करणार आहेत. दुपारी १२ वाजता माउली सांप्रदायिक महिला मंडळाचे भजन, बाहेरगावच्या पहारेकºयांचे भजन होईल. सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, आरती व रात्री आळंदी येथील अनिल महाराज तुपे यांचे हरिकीर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी हांडोरे, डॉ. बाळासाहेब कोठुळे, प्रकाश हगवणे, संजय हांडोरे, बाळू कोठुळे, अमर जमधडे व ग्रामस्थांनी केले आहे नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बंगालीबाबा दर्ग्याजवळील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सोमवारी सकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध भजनी मंडळे भजन सादर करणार आहेत. तसेच महापूजेनंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आलठक्कर सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष कन्हैयालाल आलठक्कर यांनी केले आहे. तसेच देवळालीगाव श्री विठ्ठल मंदिर, मुक्तिधाम लक्ष्मीनारायण मंदिर, जेलरोड ज्ञानेश्वरनगर श्री विठ्ठल मंदिर आदीं मंदिरांत आषाढी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढीनिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:43 AM