नाशिक : गरोदर महिलांनाही कोरोना लस देण्यात यावी की नाही, याबाबत अनेक दिवसांपासून असलेला संभ्रम संपुष्टात आणत शुक्रवारपासून (दि. १६) लसीकरणाला प्रारंभ करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, शहरात शनिवारी दुपारनंतरच लस मिळणार असल्याने गरोदर महिलांच्या लसीकरणाला पुढील आठवड्यातच प्रारंभ होणार आहे.
गरोदर महिलांनाही लस घेता येणार असल्याची सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्याप्रमाणे या लसीकरणाला प्रारंभ करण्याचे आदेश कागदोपत्री मनपा आणि जिल्हा आराेग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. जेव्हापासून लसीकरण सुरू झाले आहे, तेव्हापासून गरोदर माता आणि स्तनपान करणाऱ्या माता यांना लसीकरण केले जावे अथवा जाऊ नये याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतांतर होते. परंतु आता मात्र केंद्र शासनाने याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार आता गरोदर असलेल्या महिला आणि स्तनपान देणाऱ्या लहान बाळांच्या माता यांनासुद्धा लसीकरण सुरू केलं जाणार आहे. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका उद्भवण्याची भीती असणाऱ्या अनेक गरोदर महिला आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आई होऊ पाहणाऱ्या महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे. गरोदर मातांमध्येदेखील ३५ वर्षांवरील मातांनी लस घेताना त्यांना असलेल्या सहव्याधींची माहिती डॉक्टरांना देऊन त्यांच्या सल्ल्याने लस घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित गरोदर मातांनी ट्रीटमेंट सुरू असलेल्या डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेऊन लस घेणे आवश्यक असल्याने बहुतांश स्त्रीरोगतज्ज्ञांना त्याबाबतही सल्ला विचारला जात आहे.
गरोदर महिलांकडून विचारणा
गरोदर महिलांकडून लस घेण्याबाबत विचारणा होण्याचे प्रमाण वाढले आहे. आम्हीदेखील त्यांना लस घेण्याचा सल्ला देत आहोत. त्यामुळे भविष्यात गरोदर आणि स्तनदा मातांकडून लस घेण्यास प्राधान्य दिले जाईल, असे वाटते.
डॉ. निवेदिता पवार, स्त्री रोगतज्ज्ञ
-------
लस सोमवारपासून
गरोदर मातांना शहरातील हॉस्पिटल असणाऱ्या केंद्रांवरच लस देण्याचे नियोजन आहे. मात्र, शहरात लस शनिवारी दुपारपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक गरोदर मातांना सोमवारपासूनच लस देणे शक्य होणार आहे.
डॉ. अजीता साळुंखे, मनपा लसीकरण अधिकारी