येवला : नाशिक जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता जनतेने कमीत कमी पाण्याचा वापर करून भविष्याचा वेध घेत उपलब्ध जलसाठा १५ जुलैपर्यंत पुरविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी येवल्यात केले. येवला तालुक्याच्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजन व उपाययोजना याशिवाय मनरेगा व जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा, विविध विकासकामे यासंदर्भात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन येवला तहसील कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुशवाह यांनी जलस्रोतांसह विविध विषयांचा आढावा घेतला व विविध उपाययोजना सुचविल्या. या बैठकीसाठी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. भीषण पाणीटंचाईची पार्श्वभूमी आणि उपाययोजना ‘लोकमत’ने सातत्याने मांडली आहे. याबाबत शहराचा व तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पालखेडचे आवर्तन केव्हा देणार? शिवाय येसगाव पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्याबाबत विचार करावा ही ‘लोकमत’ची भूमिका आहे. यावर बोलताना जिल्हाधिकारी कुशवाह यांनी सांगितले की, पालखेडच्या पाणी आवर्तनाने तालुक्यातील पिण्याच्या पाणी योजनेचे साठवण तलाव मार्चअखेर पूर्ण क्षमतेने भरून देणार असल्याचे सांगून ते पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे, असे सांगितले. गेल्या ३४ वर्षांपासून बोकटे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेसाठी मिळत असलेले पालखेडचे पाणी आवर्तन यंदा देणार काय? पाणीसाठा मर्यादित असल्याने यात्रेला स्वतंत्रपणे पाणी देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. पाणी जपून वापरावे, आगामी देण्यात येणारे आवर्तन हे पुरेशा पोलीस बंदोबस्तात देण्यात येणार असून, साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आश्वासन दिले. या योजनेसाठी पूर्वी असलेले ५० दलघफू पाण्याचे आरक्षण रद्द केलेले असले तरी या योजनेबाबत पुनश्च विचार करून कार्यान्वित करण्यासंदर्भात पावले टाकली जातील, असेही कुशवाह यांनी सांगितले. मुळातच पर्जन्य कमी त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आहे. येवला तालुक्यात सध्या ३७ गावे व २६ वाड्या यांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागणी आल्यानंतर टँकर सुरू करण्याची कार्यवाही होत आहे. (वार्ताहर)
पाणी काटकसरीने वापरा
By admin | Updated: March 16, 2016 22:38 IST