नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या अचानक पाहणी दौऱ्यात नवीन प्रशासकीय इमारतीत तळमजल्यावर उपाहारगृहाच्या जागेचा वापर एका खासगी ठेकेदाराकडून त्याच्या फर्निचरच्या कामासाठी गुदाम म्हणून केला जात असल्याचे आढळून आले होते. बनकर यांनी संबंधित ठेकेदाराकडून या जागेचा वापर व जिल्हा परिषदेची वीज वापरली म्हणून वसुलीचे आदेश देत संबंधित उपाहारगृह तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात कालपर्यंत (दि.९) या उपाहारगृहाचा वापर संबंधित मक्तेदाराकडून फर्निचरचे साहित्य ठेवण्यासाठी, तसेच फर्निचर तयार करण्यासाठी प्लायवूड कापण्यासाठी याच उपाहारगृहातील विजेचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुखदेव बनकर यांचे आदेश धाब्यावर बसविण्याचे काम बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आल्याचेही यामुळे उघड झाले आहे. मागच्याच आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी नवीन प्रशासकीय इमारतीला भेट देऊन अचानक तपासणी केली होती. तळमजल्यावरील उपाहारगृहाचा वापर गेल्या दीड-दोन वर्षांपासून एका खासगी मक्तेदाराने जिल्हा परिषदेच्या विविध विभागात लागणारे लाकडी फर्निचर तयार करण्यासाठी, प्लॉयवूड ठेवण्यासाठी व कापण्यासाठी करीत असल्याचे व गुदाम म्हणून वापरत असल्याचे समजते. त्यामुळे सुखदेव बनकर यांनी हे उपाहारगृह तातडीने सुरू करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन व बांधकाम विभागाला दिल्या होत्या. तसेच गुदामासाठी सदर जागेचा वापर करणाऱ्या संबंधित मक्तेदाराकडून गेल्या दीड-दोन वर्षांपासून वापरलेली वीज, तसेच जागेचे भाडे म्हणून काही रक्कम वसूल करता येईल काय? ही रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसमध्ये जमा करण्याबाबत तयारी केली आहे. आता याप्रकरणी येत्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व सदस्य नेमकी काय भूमिका घेतात? त्यावरच या जागेचे भाडे व दीड-दोन वर्षांत वापरलेली वीज याबाबत वसुलीचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी)
उपाहारगृहाचा वापर गुदामासाठी सुरूच
By admin | Updated: March 10, 2015 01:11 IST