नाशिक : डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन अर्थात डीआरडीओच्या लगतच असलेल्या शिवनई या गावाला कधीही विस्थापित होण्याचा धोका आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या डीआरडीओ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाची शक्यता गृहीत धरून गावात बांधकामांना या विभागाने मनाई केलेली आहे. त्यामुळे विस्थापनेची टांगती तलवार घेऊन जगणाऱ्या या गावाला पर्यायी व्यवस्थेसाठीही झगडावे लागणार आहे. गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजाराच्या आसपास असून, मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. ग्रामस्थांच्या जमिनी आणि घरेही येथेच आहेत. भविष्यात जर त्यांना विस्थापित व्हावे लागले, तर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. याच भीतीच्या सावटाखाली गावातील लोक जगत आहेत. दिंडोरी तालुक्यातील मात्र नाशिकच्या अगदी जवळ वरवंडीलगत शिवनईगाव आहे. या गावाची सुमारे ३०० हेक्टर इतकी जमीन गेलेली आहे. याबरोबरच जानोरी, जऊळके, आडगाव, वरवंडी या गावातीलदेखील काही जमीन संपादित झालेली आहे; मात्र सर्वाधिक जमीन ही शिवनई गावची असल्याने विस्थापित होण्याचा पुढील धोकाही याच गावाला आहे. कारण डीआरडीओच्या संरक्षण भिंंतीपासून ३०० मीटर अंतरात शिवनई गावठाण आहे. संरक्षण विभागाने याच कार्यक्षेत्रातील नागरिकांना कोणतेही विकासकाम करण्यास मनाई केली आहे. घराचे पक्के बांधकाम आणि दुमजली घरे बांधण्यास मनाई केली आहे. ज्यांची पूर्वीची घरे आहेत किंवा ज्यांनी दोन मजली घरे बांधून ठेवली आहेत, त्यांच्यावर भविष्यात कारवाई झाली तर त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई न देण्याची नोटीसही संरक्षण खात्याने येथील नागरिकांना दिलेली आहे. डीआरडीओसाठी गावचे २८६ हेक्टर ६१ आर इतके क्षेत्र गेले असून इतर गावांचे मिळून सुमारे चार हजार हेक्टरवर डीआरडीओ सुरू आहे. या खात्याअंतर्गत शिवनईचे संपूर्ण क्षेत्र येते. त्यामुळे विस्थापित होण्याचा धोका आहेच. शिवाय संरक्षण खात्याने गावाला बांधकामावरील मर्यादेची नोटीसही बजाविली आहे. ग्रामसभेने विद्यापीठासाठी १९७, १९८, १९९ ही जागा ९९ वर्षांच्या कराराने दिलेली आहे. उर्वरित १९६ क्षेत्र गावासाठी ठेवण्यात आले असले तरी त्यावर अतिक्रमण असल्याने आणि बांधकामही करता येत नसल्याने गावाला ही जागा मिळणेही कठीण होणार आहे.
शिवनईगाव विस्थापनाच्या छायेखाली
By admin | Updated: July 25, 2016 00:09 IST