शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

उपेक्षेतून आलेल्या अस्वस्थतेचा हुंकार !

By admin | Updated: June 4, 2017 03:15 IST

दिवसेंदिवस आतबट्ट्याच्या होत चाललेल्या शेतीच्या विषयाकडे शेतकरी संपाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

साराश : किरण अग्रवाल

 

दिवसेंदिवस आतबट्ट्याच्या होत चाललेल्या शेतीच्या विषयाकडे शेतकरी संपाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या संपादरम्यान जे काही घडते आहे ती बळीराजाची स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणायला हवी, कारण आजवर वेळोवेळी अनुभवास आलेली उपेक्षेची वेदना त्यापाठीमागे आहे. शेतकरी कुटुंबातील तरुण पिढी निराशेचा सामना करताना किती अस्वस्थ आहे, याचाच प्रत्यय यातून यावा. संपाच्या माध्यमातून प्रदर्षित अस्वस्थतेच्या हुंकाराकडे गांभीर्यानेच बघितले जायला हवे, कारण तो नव्या क्रांतीची नांदी घडविणारा आहे.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी अखेर रस्त्यावर उतरला. आपल्याच हाताने आपण किंवा आपल्या भाऊबंदाने पिकवलेला शेतमाल त्याने रस्त्यावर आणून टाकला, हे अचानक घडून आलेले नाही. निसर्गाने झोडपलेला व यंत्रणेने नागवलेला बळीराजा उदास झाला आहे, हताश झाला आहे. खिन्नतेतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसेनासा झाल्याने तो आत्महत्येकडे वळू लागला आहे. वर्षानुवर्षांपासून अव्याहतपणे हे चालत आले आहे. यात बदल होण्याची चिन्हेही दिसत नसल्याने, त्यातून जी अस्वस्थता आली आहे, ती या संपामागे व त्याच्या रस्त्यावर उतरण्यामागे आहे, हे समजून घ्यायला हवे.शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा यासह स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीसोबतच विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांनी १ जूनपासून संप पुकारल्याने या प्रश्नातील गांभीर्य सरकारसह सर्वांच्याच लक्षात आले असावे. प्रारंभी पुणतांबा येथे झालेल्या बैठकीत घेतल्या गेलेल्या शेतकरी संपाच्या निर्णयाला बघता बघता संपूर्ण राज्यातीलच शेतकऱ्यांचे पाठबळ लाभले. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच भागांतील बळीराजा या संपात उतरला यावरून शेतकऱ्यांमधील अस्वस्थतेची भावना किती वा कशी सार्वत्रिक स्वरूपाची आहे, याचा अंदाज बांधता यावा. पूर्वी शेतकरी आत्महत्या या विदर्भातच होत, आता त्या सधन व समृद्ध म्हणविणाऱ्या परिसरातही होऊ लागल्या आहेत, आणि दिवसेंदिवस त्यात वाढच होत असल्याचे दिसून येणारे चित्र या अस्वस्थतेत अधिकची भर घालणारे ठरले आहे. त्यामुळे आता फास घेऊन मरायचे नाही किंवा आत्महत्या करून जीवन संपवायचे नाही तर लढायचे; अशी शपथ घेऊन शेतकरी संपात उतरले आहेत. आपण आपल्यापुरते पिकवायचे, त्याचा पुरवठा इतरांना होऊ द्यायचा नाही म्हणजे संबंधितांना त्याची झळ बसून आपल्या प्रश्नाची धग जाणवेल अशी त्यामागील प्रेरणा. त्यातूनच जागोजागचे शेतकरी रस्त्यावर उतरले. शहरात चाललेला शेतमाल त्यांनी रोखून धरला. काही ठिकाणी तो रस्त्यांवर फेकून देत सरकारी अनास्थेचा निषेध नोंदविण्यात आला. हा निषेध नोंदतांना भाजीपाला, फळफळावळसह तेलाचे डबे, अन्य शेतमाल व अधिकतर दुधाची नासाडी घडून आली असली तरी, सततच्या उपेक्षेतून आलेल्या अस्वस्थतेची ती वाफ म्हणायला हवी, जी या निमित्ताने उफाळून आलेली दिसली. म्हणूनच, हा वर्ग एवढा वा असा अनावर का झाला, का ओढवली त्यांच्यावर आपलाच काबाडकष्ट करून पिकवलेला माल रस्त्यावर फेकून देण्याची किंवा आपल्याच शेतात मेंढ्या चरण्यासाठी सोडून देण्याची वेळ; याबाबत गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला जाणे गरजेचे आहे.किसान क्रांती समितीने यासंदर्भात संपाचे हत्यार उगारल्यावर नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार गावांपैकी तब्बल दीड हजार गावांमधून या संपात सहभागी होण्याचे ठराव केले गेल्याचे व प्रत्यक्ष संपकाळात संपूर्ण जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे पाहता, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी चळवळीचे मूळ टिकून असल्याचे स्पष्ट व्हावे. १९८० च्या दशकात शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणविल्या गेलेल्या शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने नाशिक जिल्ह्यात बाळसे धरून देशव्यापी शेतकरी चळवळीची ठिणगी पेटविली होती. संघटनेचा लाल बिल्ला अभिमानाने छातीवर मिरवणाऱ्या ग्रामस्थांची गावेच्या गावे तेव्हा जोशी यांच्या पाठीशी उभी राहिली होती. कारण, शेती उत्पादनासाठी येणारा खर्च व शेतमालाला मिळणारा भाव याचे शास्त्रशुद्ध त्रैराशिक शरद जोशी यांनी मांडून बळीराजाच्या दैन्याला खऱ्या अर्थाने इतरेजनांसमोर आणले होते. ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ ही त्यांची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनेचा हुंकार ठरली होती. सुमारे तीस-चाळीस वर्षे या उद्गाराचे व चळवळीचे गारुड शेतकरी वर्गाच्या मनावर होते. आजही अनेकजण असे आहेत, जे जोशींच्या पश्चातही लाल बिल्ल्याशी ईमान राखून आहेत. पण, दुर्दैव असे की जोशी यांच्या हयातीच शेतकरी संघटना उतरंडीला लागली. ‘राजकारणात गेलो तर जोड्याने मारा’ असे सांगणारे शरद जोशी अखेर राजकारणातीलच घटक झाले म्हटल्यावर आणि त्यातही त्यांच्या राजकीय धरसोडीमुळे संघटनेत फाटाफूट झाली. तद्नंतरच्या काळात ‘लाल बिल्ला’च घेऊन राजू शेट्टींसह अन्यही नेते पुढे आले. त्यांनी शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर राजकारणही चालविले, त्यातून त्यांची भरभराट झालेली दिसून आली; परंतु शेतकरी आपला आहे तेथेच व तसाच राहिला. आज शेतकरी संपानिमित्त शेतकऱ्यांचा कै वार घेणारे अन्यही जे जाणते नेते दिसून येत आहेत, ते स्वत: सत्तेत असताना व त्यांच्याकडे शेती खाते असतानाही या स्थितीत फारसा काही बदल घडून आला होता अशातला भाग नाही. त्यामुळे अशांच्या यात्रांना प्रतिसाद लाभण्याऐवजी त्यांनी निर्माण करून ठेवलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यातील सामान्यांतून पुढे आलेल्या विचाराला बळीराजाचे उत्स्फूर्त व मोठे पाठबळ लाभलेले दिसून आले. संपूर्ण राज्यातील शेतकरी एकविचाराने संपाच्या भूमिकेमागे एकवटले. हा राजकारण्यांचा, राजकारणप्रेरित किंवा कोणत्याही पक्षाचा झेंडा असलेला उठाव नाही, तर तो शेतकरी क्रांतीच्या विचाराने आकारास आलेला हुंकार ठरला, त्याला ही अशी सारी परिस्थिती कारणीभूत आहे. महत्त्वाचे म्हणजे, या शेतकरी संपात जागोजागचे प्रस्थापित राजकीय नेते अपवादानेच आढळलेत, पण मोठ्या प्रमाणात आघाडीवर दिसुन आले ते तरुण. गेल्या काही दिवसांपूर्वी निघालेल्या विविध मोर्चांमध्ये जशी तरुण फळी पुढे आलेली दिसली तशी शेतकरी कुटुंबातील नवी पिढी या संपाच्या निमित्ताने पुढे आलेली पाहावयास मिळाली. संपाचे रूपांतर आंदोलनात झालेले व काही ठिकाणी ते नासधूस अगर आक्रमक पातळी गाठलेले दिसून आले, ते याच तरुणाईच्या अनावरतेमुळे; जे त्यांच्या मनात आजवर ठसठसणाऱ्या व खदखदणाऱ्या वेदनेतून स्वाभाविकपणे घडून आल्याचे म्हणायला हवे. असह्य ठरलेला प्रचंड कोंडमारा ही तरुण पिढी सहन करताना दिसते आहे. शेती परवडत नाही, बाहेर हाताला काम नाही, शेतमालाला दाम नाही, अशात निसर्ग रुसला वा रागावला आणि ज्याच्याकडे आधारासाठी आशेने बघावे ती शासन यंत्रणाही हात झटकून राहताना दिसली म्हटल्यावर आशाच संपणार ना! शेतकरी कुटुंबातील तरुण फळी आज अशा निराशेच्या वावटळीत सापडली आहे. या वावटळीत उडून जाण्याची वा मोडून पडण्याची भीती त्यांना सतावते आहे. आपल्या आज्यापासून ते वडील-काकांपर्यंतच्या पिढ्यांच्या या व्यवसायातील हालअपेष्ठा व ओढवलेले दुष्टचक्र त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे त्यांचे कसेबसे निभावून गेले, आपले काय; हा डोके सुन्न करून टाकणारा प्रश्न त्यांना अस्वस्थ करणारा ठरला आहे. अर्थात, शेतकऱ्यांच्या या दैन्यावस्थेला अनेक कारणे आहेत. त्यात कालमानापरत्वे न बदलण्यात आलेली पीकपद्धतीदेखील आहे. पारंपरिकता सोडून विचार केल्याखेरीज ते होणार नाही. साधनांचा अभाव, वीज मोटारींना लागणाऱ्या विजेचा लपंडाव, हवामान खात्याकडून न मिळू शकणारी अचूक माहिती व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इतर उद्योगधंद्यांच्या तुलनेत शेतीप्रश्नाबाबत दिसून येणारी सरकारची अनास्था यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यातून अस्वस्थता वाढीस लागली आहे. या अस्वस्थतेतूनच ही तरुण फळी कोणत्याही राजकीय नेत्याच्या अगर पक्षाच्या पाठीमागे न जाता स्वयंस्फूर्तीने एकवटली व कधी नव्हे, ती शेतकरी संपाची ठिणगी पडून गेली, जिने आगीचे स्वरूप धारण केलेले पाहावयास मिळाले. तेव्हा, अशा विस्तवाशी खेळण्यापेक्षा सरकारने या विषयाकडे तातडीने लक्ष पुरवायला हवे.