इंदिरानगर : श्रीरामनगरमध्ये भरवस्तीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या लघुउद्योगांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.श्रीरामनगरमध्ये बंगले, अपार्टमेंट व सोसायटी आहेत. यामध्ये शेकडोच्या संख्येने लोकवस्ती आहे. श्रीरामनगर लगत हरितपट्टा आहे. या ठिकाणीपूर्वी शेती करण्यात येत होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी एकएक करून सुमारे ७ ते ८ लघुउद्योग कोणत्याही परवानगीविना थाटल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. लघुउद्योगाच्या कारखान्यांत दिवसा व रात्रीही कामे सुरू असल्याने त्यांचा काळा धूर निघतो. त्यामुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुर्गंधीयुक्त निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील रहिवाशांना घराची दारे-खिडक्या उघडणेसुद्धा मुश्किल झाले आहे. तसेच वाढत्या वायुप्रदूषणामुळे नाक, घसा आणि डोळ्यांच्या विकारात वाढ झाली आहे.कोणतीही परवानगी नसताना परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या लघुउद्योगावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)
श्रीरामनगरमध्ये अनधिकृत लघुउद्योग; नागरिक त्रस्त
By admin | Updated: November 16, 2015 21:40 IST