पंचवटी : निमाणी बसस्थानकासमोरील रस्त्यावर काही रिक्षाचालकांनी अनधिकृतपणे रिक्षाथांबा केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. बसस्थानकासमोर असलेल्या या अनधिकृत रिक्षाथांब्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने कारवाई करणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. जुना आडगाव नाका ते निमाणी बसस्थानक रस्ता-दिंडोरी नाका या परिसरात वाहनांची कायमच वर्दळ असते. बसस्थानकासमोर असलेल्या सूर्या हॉस्पिटल रस्त्यावर अनेक रिक्षाचालक रिक्षा उभ्या करून प्रवासी भरतात. यामुळे निमाणी बसस्थानकातून बस बाहेर नेताना चालकांना अडथळा निर्माण होतो. त्यातच संबंधित रिक्षाचालकांना रिक्षा पुढे घेण्यास सांगितले असता ते वाद घालतात. थांबा नसताना भर रस्त्यात रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या रिक्षाचालकांविरुद्ध वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असून, परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलीस या रिक्षाचालकांकडे लक्ष केंद्रित करतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
निमाणी बसस्थानकासमोर अनधिकृत रिक्षाथांबा
By admin | Updated: April 26, 2015 23:11 IST