नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी आॅप्शन अर्ज दाखल केल्यानंतरही त्यात सुधारणा करण्याची संधी तंत्रशिक्षण विभागाने उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आॅप्शन अर्ज भरताना कॉलेजचा प्राधान्यक्रमात बदल करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेससाठी आॅप्शन अर्ज भरण्यास कालपासून प्रारंभ झाला असून, उद्या आॅप्शन अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. आॅप्शन अर्ज भरताना कित्येकदा विद्यार्थी हे चुकीचे अर्ज भरतात किंवा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना त्यांच्या अर्जातील प्राधान्यक्रमात बदल करावा असे वाटते. यापूर्वी त्यांना तसे करता येणे शक्य नव्हते; परंतु आता त्यांना त्यांच्या कॉलेज प्राधान्यक्रमात बदल करण्याची संधी मिळणार आहे. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर अत्यंत घाईतच विद्यार्थी महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरतात. त्यावेळी त्यांना पुरेशी माहिती मिळेलच असे नसते. अर्ज भरल्यानंतर त्यांना आॅप्शन बदलावा असे वाटू शकते. असे अनेक प्रकार घडलेही आहेत. त्यांनी अशी संधी मिळावी म्हणून तंत्रशिक्षण विभागाने जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी एआरसी सेंटर्स आहेत तेथील प्रमुखाला विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या आॅप्शन अर्जातील आॅप्शन बदलण्याची मुभा देण्याची सूचना तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. तसे आदेशही सेंटर्सला प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात आता सुधारणा करता येणार आहे. दरम्यान, आजपासून अशा प्रकारची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली त्याचा लाभ काही विद्यार्थ्यांनी घेतला. मंगळवारीही (दि. १५) विद्यार्थ्यांना तशी संधी दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात एकच दिवस असून, गेल्या रविवारपासून आॅप्शन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारीही बदल करण्याची संधी मिळणार आहे. शहरात अभियांत्रिकी प्रवेशासाठीचे १४ एआरसी सेंटर्स आहेत. (प्रतिनिधी)
‘आॅप्शन’ अर्जासाठी आज अखेरची संधी
By admin | Updated: July 15, 2014 00:49 IST