व्यवसायापोटी सव्वा पाच लाखांची फसवणूक;
कापूरवडीचा कच्चा मालाच्या विक्रीचे आमिष
नाशिक : कापूरवडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदी-विक्रीचे आमिष दाखवून ऑनलाईन पध्दतीने सायबर चोरट्यांनी एका गरजूला सुमारे सव्वा पाच लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णम रघुनाथ लोहे (रा.रोहिणीनगर,पेठरोड) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोहे यांना व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन व्यवसायाच्या शोधात होते. दरम्यान, त्यांना कापूर वडी तयार करण्याबाबतच्या व्यवसायाची माहिती मिळाली. त्यांनी मेलवर प्रत्युत्तर दिले असता त्यांच्याशी वेगवेगळ्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. संशयित एन. प्रभाकरन नावाच्या व्यक्तीने कापूर वडीचा कच्चा माल स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखविले. लोहे यांनी प्रभाकरन यांच्यावर विश्वास ठेवत १४ जानेवारीपासून वेळोवेळी आंध्रा बँकेत ५ लाख १५ हजार ७४५ रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. महिना उलटूनही कच्चा माल लोेहे यांना न मिळाल्याने त्यांनी बँकेत चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
----
रिक्षाचालकाकडून कोयत्याने हल्ला
नाशिक : दारू पिण्यास पैसे दिले नसल्याचा राग मनात धरत एका अॅपे रिक्षाचालकाने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना पेठरोड भागात घडली. जखमी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून संशयित हल्लेखोर आकाश कैलास जाधव (रा.फुलेनगर) याच्याविरूद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी दत्ता रंगनाथ गोसावी मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास पेठरोड भागातील एका दुकानासमोर उभा असताना संशयित रिक्षाचालकाने त्यास गाठले. यावेळी संशयित जाधव याने गोसावी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, जाधव याने पैसे देण्यास नकार देताच संशयित जाधव याने त्यास शिवीगाळ करीत (क्र.एमएच १५ यू ५६२९) या रिक्षातील पाठीमागे प्रवाशांचे बसण्याचे सीट उचकटून त्याखालून कोयत्यासारखे घातक हत्यार काढले आणि गोसावी यांच्यावर वार केले. या हल्ल्यात गोसावी यांच्या कपाळाला दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.