त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या हजारो भाविकांमुळे निर्माण होणारा कचरा नियंत्रणात रहावा म्हणून त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने काढलेल्या निविदेनुसार नांदेडच्या ठेकेदारामार्फत ७०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने साफसफाई केली जात आहे. दोन पाळ्यांमध्ये सातत्याने होत असलेल्या या सफाईमुळे गावात स्वच्छता ठेवणे सोपे जात आहे. शाही मिरवणुका गेल्यानंतर रस्त्यांवर होणारी फुलांची रास, पाण्याच्या बाटल्या, भाविकांकडून खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर डिश, रॅपर्स, केळीच्या साली, पाण्याचे ग्लास हा सारा कचरा झाडून तत्काळ घंटागाडीत जमा केला जात असल्याने त्र्यंबकमधील सर्व प्रमुख रस्ते स्वच्छ दिसत आहेत.या स्वच्छतेच्या कामासाठी उत्तर प्रदेश, बिहार, अलाहाबाद येथून ५०० तर नाशिक, सातपूर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील वाघेरा, काचुर्ली, तळेगाव, हिरडी आदि ठिकाणचे २०० ते २५० असे एकूण साडेसातशेच्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी टॅबच्या मदतीने रोजच्या रोज फोटो काढून घेतली जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेल्या सफाई कामगारांना उज्जैन, हरिद्वार येथे भरणाऱ्या कुंभमेळ्या दरम्यान साफसफाईचा अनुभव असल्याने आणि त्यांनी स्वत:हून त्र्यंबकेश्वर-नाशिकला येण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना पाचारण करण्यात आले असल्याचे ठेकेदार प्रिशियसचे सुपरवायझर सचिन डहाळे यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांची हजेरी पारंपरिक पद्धतीने (मस्टर किंवा थंबइम्प्रेशन) न घेता जीपीएस प्रणालीचा उपयोग करून टॅब सिस्टीमने घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी अशा प्रकारे हजेरी घेणे रेंज मिळत नसल्याने आणि नेटवर्कमध्ये अडथळे येत असल्याने अशक्य झाले होते. परंतु आता ही समस्या दूर झाली असून, टॅबद्वारे हजेरी सुरळीतपणे होत आहे. यासाठी सात सुपरवायझर कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
दिवसातून दोनदा होतेय त्र्यंबकची साफसफाई
By admin | Updated: September 5, 2015 22:17 IST