नाशिकरोड : आगरटाकळी रोडवरील आढाव मळ्याजवळ गोदावरी नदीकिनारी रविवारी सायंकाळी फिरण्यास गेलेला वसतिगृहाचा व्यवस्थापक व विद्यार्थी नदीपात्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत असून, आज अग्निशामक दलाच्या जवानांनी दिवसभर शोध घेऊनही त्यांचा तपास लागू शकला नाही.आगरटाकळी रोडवर गुड शेफर्ड होम हे वसतिगृह आहे. रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे व्यवस्थापक मुकेश अंबादास हिवराळे हे १५ विद्यार्थ्यांना घेऊन आढाव मळा मनपाच्या मलनिस्सारण केंद्राच्या परिसरात गोदावरी नदीकिनारी फिरण्यास गेले होते. यावेळी आनंदऋषी शाळेत आठवीच्या वर्गात शिकणारा आकाश अशोक गायकवाड (१५) मूळ रा. भांडुप मुंबई याचा पाय घसरल्याने तो नदीत पडून गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी व्यवस्थापक मुकेश शिवराळे याने आकाशला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते दोघेही पाण्यात बुडून दिसेनासे झाले. सदर घटनेची माहिती पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी बोटीच्या साह्याने रविवारी रात्री व आज दिवसभर नदीपात्रात गळ टाकत बुडालेल्या आकाश व मुकेश हिवराळे यांचा शोध घेतला. परंतु त्या दोघांचा तपास लागू शकला नाही. नदीपात्रात नवीन पुलाच्या पिलरजवळच हे दोघेही जण पाण्यात बुडाले. तेथून शेजारीच मनपाच्या मलनिस्सारण केंद्रातून मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडले जाते. यामुळे त्या ठिकाणी वाहत्या पाण्याचा प्रवाह जास्त आहे. विद्यार्थी आकाश व व्यवस्थापक मुकेश हिवराळे यांचे नातेवाईक व गुड शेफर्ड होम या संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आज दिवसभर नदीपात्रावर ठाण मांडून होते. (प्रतिनिधी)