मालेगाव : शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत शहर पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्यासह पथकाने आज दुपारी दीडच्या सुमारास छापा टाकून दोन लाख २९ हजार ८०० रुपयांच्या गुटख्यासह सुमारे ६५० ते ७०० गोणी रेशनची साखर जप्त केली. यामुळे शहरात स्वस्त धान्याचा तसेच गुटख्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. येथील शहर पोलीस उपअधीक्षक राजमाने यांना मिळालेल्या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित व मानकर, उपनिरीक्षक बागुल व मारवाल यांच्यासह पोलीस हवालदार सुरेश मोरे, सचिन भामरे, इम्रान सय्यद, गिरीश बागुल, भरत गांगुर्डे यांनी पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सवंदगाव शिवारात असलेल्या अलीया मस्जीदजवळील एका ^पत्र्याच्या गुदामावर छापा टाकला. या छाप्यात गुदामात ५० किलो वजनाच्या ६०० पेक्षा जास्त गोण्यांत सुमारे ३५ टन रेशनिंगची साखर तसेच पोत्यांत भरलेला गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत दोन लाख २९ हजार रुपये असून, साखरेच्या किमतीचा पंचनामा बाकी होता. या साखरेची किंमत काढण्यासाठी तहसीलच्या अधिकाऱ्यांसह पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे आकडेवारी समजू शकली नाही. पोलिसांनी पंचनामा करून सदर माल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी गुदाममालक अब्दुल अजीज बाबू ऊर्फ अज्जुमामा यांच्या विरोधात पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)
दोन लाख ३० हजारांचा गुटखा मालेगावी जप्त
By admin | Updated: October 4, 2015 22:09 IST