नाशिक : शहरातील सर्वच बॅँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी अन् बॅँकेचे व्यवहार करण्यासाठी रांगाच रांगा लागत असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशात काही बॅँकांमध्ये कर्मचाऱ्यांकडूनच ग्राहकांना चुकीची वागणूक दिली जात असल्याने त्यात भर पडत आहे. एमजीरोड परिसरातील आयडीबीआय बॅँकेच्या शाखेत असाच एक प्रकार समोर आला असून, साहेबांना शंभरच्या नोटा आणि ग्राहकांना दोन हजारांच्या नोटा दिल्या गेल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. दोन, अडीच तास रांगेत उभे राहिल्यानंतर ग्राहकाच्या हातावर दोन हजार रुपयांच्या नोटा टेकवल्या. संबंधित ग्राहकांने शंभर, पन्नास, वीस किंवा दहा रुपयांच्या नोटा दिल्या जाव्यात अशी मागणी केली असता संबंधित महिला कॅशिअरने त्यास नकार दिला. मात्र त्याचदरम्यान बॅँकेचाच एक कर्मचारी शाखा व्यवस्थापकांचा दहा हजार रुपयांचा चेक घेऊन कॅशिअरकडे आला. रांगेत उभे न राहता त्याने थेट कॅशिअरकडे चेक सोपविला. तसेच साहेबांना केवळ शंभरच्याच नोटा द्याव्यात, असा आदेशही कॅशिअरला दिला. हा संपूर्ण प्रकार रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांसमोरच घडल्याने त्यांनी थेट शाखा व्यवस्थापकालाच याबाबतचा जाब विचारला; मात्र शाखा व्यवस्थापकाने ग्राहकांचे समाधान न करता, त्यांनाच सुनावण्याचा प्रयत्न केला. तसेच सुटे पैसे असतील तरच दिले जातील असे सांगत माझ्याशी हुज्जत घालून तुम्हाला काहीही मिळणार नाही असे सुनावले. हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याने काही काळ शाखेत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. परंतु शाखा व्यवस्थापकाने याकडे फारसे लक्ष न देता किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना कामात सुधारणा करावी असे न सांगता थेट ग्राहकराजाचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)महिला कर्मचाऱ्यांची हुज्जततब्बल दोन-अडीच तास रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर आलेल्या ग्राहकांचे व्यवहार पूर्ण न करता कॅशिअर महिला कर्मचारी फोनवर बोलण्यात अधिक वेळ घालवित आहेत. याविषयी त्यांना विचारल्यास त्या थेट ग्राहकांशीच हुज्जत घालत आहेत. शाखा व्यवस्थापकाकडे त्यांची तक्रार करूनदेखील त्यांना सूचना दिल्या जात नसल्याने काही ग्राहकांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्याशीच संबंधित बॅँकेविषयी व शाखा व्यवस्थापकांविषयी पत्रव्यवहार करणार असल्याचे ग्राहकांनी बोलून दाखविले.
साहेबांना शंभरच्या नोटा अन् ग्राहकांना दोन हजाराच्या
By admin | Updated: November 16, 2016 01:22 IST