नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना कैद्यांशी नियमबाह्य संबंध ठेवल्याप्रकरणी कारागृह प्रशासनाने निलंबीत केले आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे व बेवारसरित्या सापडणारे मोबाईल, अंमली पदार्थ, कैद्यातील वादविवाद, मारामाऱ्या अशा घटनांमुळे कारागृह नेहमीच चर्चेत राहात आहे. कारागृहाचा शिपाई दिनेश पाटील व लिपीक ज्ञानेश्वर वाडिले या दोघांचे कैद्यांशी नियमबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून गोपनीय माहिती घेत त्यांची चौकशी करण्यात येत होती. कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी नुकतीच कारागृहाला भेट दिली असता या दोघा कर्मचाऱ्यांचा कैद्यांशी असलेल्या नियमबाह्य संबंधाबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालामध्ये सकृतदर्शनी पाटील व वाडीले हे दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर कारागृह प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.
नाशिकरोड कारागृहातील दोन कर्मचारी निलंबित
By admin | Updated: September 2, 2016 01:27 IST