येवला : तालुक्यातील अंगणगाव येथील पावसात विजेच्या धक्क्याने २ गायी ठार झाल्या. येवला शहरासह अंगणगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विद्युत तारेचा वीजप्रवाह जमिनीत उतरला व जमिनीवरील पाण्यातून प्रवाहित झाल्याने विजेचा शॉक लागून दोन गायी ठार झाल्या.अंगणगाव येथील रमेश दिनकर खैरनार यांच्या गायी चरण्यासाठी गेलेल्या होत्या. अंगणगाव रस्त्यावरील पोलीस वसाहतीमागे गायी चरत असतानाच अचानक पाऊस सुरू झाला. जवळ असलेल्या विजेची वाहकतार खंडित असल्याने त्या विद्युत तारेतून विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने दोन गायी जागीच ठार झाल्या. या गायी दूध देणाऱ्या असल्याने या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून होता. गायी गेल्याने या कुटुंबाचे अश्रू अनावर झाले. सर्व कुटुंब रडू लागले. गायीच्या रूपाने असलेला आधार गेल्याने कुटुंब अडचणीत आले आहे. तलाठी राजेंद्र केवारे यांनी पंचनामा केला. येवला शहरात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. (वार्ताहर)
अंगणगाव येथे विजेच्या धक्क्याने दोन गायी ठार
By admin | Updated: September 13, 2015 23:44 IST