धनंजय वाखारे : नाशिकमहापालिका निवडणुकीत सर्वाधिक चाळीस नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंचवार्षिक काळात आधी भाजपाच्या नंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कुबड्या घेऊन कसाबसा संसार केला. कधी प्रशासकीय तर कधी राजकीय कारणांमुळे राज ठाकरे यांनी दाखविलेल्या विकासाची मात्रा काही चालली नाही आणि रुळावर प्रथमच चढलेल्या इंजिनचे तब्बल सव्वीस डबे घसरले. सत्ताधारी असूनही पक्षाची वाताहत होण्याचे दुर्भाग्य मनसेच्या वाट्याला आले.सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत फार्मात असलेल्या मनसेच्या राज करिश्म्यावर चाळीस जण स्वार होत निवडून आले आणि सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या मनसेने भाजपाच्या साथीने सत्तापद हस्तगत केले. महाराष्ट्रात पहिल्यांदा महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. मनसेचे पहिले महापौर म्हणून अॅड. यतिन वाघ यांना बहुमान प्राप्त झाला, तर उपमहापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी यांची वर्णी लागली. मात्र, महत्त्वाची अर्थवाहिनी मानली जाणारी स्थायी समिती कॉँग्रेसचे उद्धव निमसे यांच्या हाती गेल्याने मनसे-भाजपाची कोंडी झाली. कधी पूर्णवेळ आयुक्तच नाही तर कधी शासनाकडून वेगवेगळ्या प्रकल्पांना मिळणाऱ्या स्थगित्या यामुळे कामकाज करणे अवघड होऊन बसल्याची कबुली खुद्द राज यांना द्यावी लागली आणि इच्छा असूनही विकासाची वाट धरता येत नसल्याचे सांगत शासनावर खापर फोडत राहिले. मित्र पक्ष भाजपातही कामे होत नसल्याने असंतोष पसरला आणि भाजपा मनसेपासून अलग झाला. पुढच्या अडीच वर्षांत दुसऱ्यांदा महापौर निवडीची वेळ येऊन ठेपली त्यावेळी राजकीय समीकरणे बदलली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनचे घसरले सव्वीस डबे
By admin | Updated: December 31, 2016 22:50 IST