सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने भगरीबाबानगर येथील रहिवाशांना वीजपुरवठ्याअभावी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. महावितरणने दखल न घेतल्याने रहिवाशांनी लासलगाव गटाचे जि.प. सदस्य डी.के. जगताप यांची भेट घेऊन रहिवाशांसाठी स्वतंत्र सिंगल फेज डी.पी. मंजूर करावी, तसेच घरगुती वीज कनेक्शनबाबतच्या अडचणी दूर करण्याची मागणी केली. त्यानुसार, डी.के. जगताप यांनी खासदार डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क साधत वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याची विनंती केली, तसेच महावितरण कंपनीचे सहायक अभियंता सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. अखेर वीस दिवसांनंतर भगरीबाबानगर येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, तसेच या नगरसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे आश्वासन देण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत झाला त्याप्रसंगी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शहर अभियंता रोशन धनवीज, रवींद्र जाधव, रोहित पठारे, मनोज शिंदे, दीपक डगळे, रामदास मालुंजकर, रणधीर मोरे व नगरचे रहिवासी उपस्थित होते.
कोट...
कोटमगाव शिवारातील भगरीबाबानगरमध्ये इलेक्ट्रिक तारा ओढल्या असून, फक्त ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. येथील प्रत्येक रहिवाशाकडे स्वतःचे मीटर आहे. ट्रान्सफॉर्मर आणि केबल याकरिता कमीत कमी दोन लाखांचा निधी लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किंवा खासदार भारती पवार यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- सुवर्णा जगताप
सभापती, लासलगाव बाजार समिती