सिडको : वडिलोपार्जित जमिनीबाबतचा न्यायप्रविष्ट असलेला दावा मागे घेत नसल्याचा राग मनात धरून शिवसेनेचे माजी नगरसेवक तानाजी फडोळ माझ्या कुटुंबीयांना दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप याचिकाकर्ते शांताराम फडोळ यांनी पत्रकार परिषदेत केला. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अंबड औद्योगिक वसाहतीत शांताराम तुकाराम फडोळ यांना १९७५ साली वडिलोपार्जित जमीन देण्यात आली होती. ही जमीन दिल्यानंतर त्यांना या जमिनीच्या मोबदल्यात भूपीडित शेतकऱ्यांना एमआयडीसीमध्ये पीएपी मागणीसाठी अर्ज केल्यानंतर मोबदला मिळत होता, परंतु शांताराम फडोळ यांनी अर्ज केल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक तानाजी फडोळ यांनी त्यांच्या सातबाऱ्यावर कुठलाही संबंध नसताना भूखंड मिळविला होता. यानंतर शांताराम फडोळ यांनी माहितीच्या अधिकारात याबाबतची माहिती मागितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने तानाजी फडोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. परंतु तानाजी फडोळ यांनी सत्तेचा वापर करत राजकीय वजन वापरून प्रकार उघडकीस आणला म्हणून शांताराम यांच्या कुटुंबीयांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. केस मागे घेण्यासाठी शिवीगाळ करणे, शांताराम यांच्या भाऊबंदकीतील लोकांना भडकावून त्यांच्याशी वाद घालण्यास प्रवृत्त करणे, घरासमोरील रस्ता बंद करणे, गावकीच्या लोकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये बदनामी करणे, विशेष म्हणजे गावातील मंदिरात दर्शनासाठी बंदी घालणे, घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुंडांना बसवून दमदाटी करत जिवे ठार मारण्याची धमकी देणे त्यांच्या कुटुंबास वेठीस धरत असल्याचा आरोपदेखील शांताराम फडोळ व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच गावातून हद्दपार करण्याच्या धमक्या वारंवार दिल्या जात असल्या कारणास्तव आम्हा सर्व कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सर्वच कुटुंब दहशतीच्या वातावरणात जगत आहे. माझ्या कुटुंबात पत्नी, मुलगा व मुलगी असून, आता आम्ही न्याय मिळावा यासाठी कुटुंबासह उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचेही फडोळ यांनी सांगितले.
जमिनीच्या वादातून वेठीस धरण्याचा प्रयत्न
By admin | Updated: October 23, 2016 00:22 IST