निफाड : जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींनी न्यायालयाच्या आवारातून पलायनाचा प्रयत्न केला. निफाड न्यायालयाच्या आवारात शनिवारी (दि. ७) रोजी ही घटना घडली. पोलिसांच्या समयसुचकतेमुळे संशयित लगेचच जेरबंद झाले.दौलत नारायण पाडवी यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनला ५ जुलै २०१३ रोजी दिलेल्या तक्र ारीत मुंबई - आग्रा महामार्गालगत असलेल्या भाग्योदय हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या अशोक ऊर्फ सुरेश गुप्ता (चाचा) याच्याकडून संजय मोतीराम सूर्यवंशी व मधुकर विजय माळी यांनी दारू मागितली होती. दारू न दिल्याने दोघांनीही अशोक गुप्ता यांस मारहाण करून त्याचा खून केला होता. तसेच मृताचे शव बेदाणा शेडमध्ये टाकले होते. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी गुन्हा नोंदवत संजय मोतीराम सूर्यवंशी व मधुकर विजय माळी यांना अटक केली. सुनावणीत नऊ साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम सुनावणीत संजय सूर्यवंशी व मधुकर माळी यांना जन्मठेप व प्रत्येकी १५०० रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.