पंचवटी : तारवालानगर-हिरावाडी लिंकरोडने अमृतधाम चौफुलीकडे जाणाऱ्या पिकअप व रिक्षाला भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत रवींद्र सुरेश बोचरे हा (१९, रा. विडी कामगारनगर) हा युवक जागीच ठार झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत़ रविवारी (दि़११) सकाळी आठ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी उड्डाणपुलाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून पाऊण तास रास्ता रोको केला़ याप्रकरणी ट्रकचालक द्वारका बद्रिनाथ प्रसाद (रा़ पश्चिम बंगला) विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, विडी कामगारनगर येथील रहिवासी रवींद्र बोचरे हा सकाळी दूध घेण्यासाठी चौफुलीवर आला होता. वडील रिक्षाचालक असल्याने ते आपल्या रिक्षासह (एमएच १५, एके ६३३२) रस्त्याच्या कडेला उभे होते़ या ठिकाणी रवींद्र व मुंबईला कामानिमित्ताने जाणारे गणेशनगर येथील राजू भामरे व अन्य दोघेजण उभे असतानाच ओझरकडून अमृतधाम चौफुलीकडे जाणाऱ्या मालट्रकने (एचआर २३, डीडब्ल्यू १९१४) चौफुलीकडे जाणाऱ्या पिकअपला (एमएच १५, ईजी ०४२६) जबर धडक दिली. या धडकेनंतर बोचरे याच्या डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर भामरे व अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. अमृतधाम चौफुलीवर वारंवार अपघात होत असल्याने उड्डाणपुलाची मागणी तसेच आमदार व खासदारांनी घटनास्थळी यावे यासाठी शेकडो नागरिकांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन सुरू केले व सुमारे पाऊण तास वाहतूक ठप्प झाली़
अमृतधाम येथे तिहेरी अपघात
By admin | Updated: September 12, 2016 01:54 IST