त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता वेगाने घटत असून, विलगीकरण कक्षात केवळ १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांचा क्वारंटाईन काळ संपत आल्याने तेसुद्धा दोन-तीन दिवसात घरी परतणार आहेत. दरम्यान, दि. १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होण्याची घाेषणा झाली असली त्याबाबतचा लेखी आदेश प्राप्त न झाल्याने मंगळवारी दुकाने उघडण्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
त्र्यंबकेश्वर येथे सध्या शिवप्रसाद कोविड केअर सेंटरमध्ये २, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर
येथे ४, हरसूल येथे २, तर गृहविलगीकरणात ६ असे फक्त १४ रुग्ण दाखल आहेत. मागच्या वर्षीच्या पहिल्या लाटेपेक्षा यावर्षीच्या मार्च, एप्रिलमधील दुसऱ्या लाटेची भीषणता अधिक होती. त्यात त्र्यंबकेश्वर शहरातील
अनेक कुटुंबांतील सदस्यांना गमवावे लागले. तालुक्यात आतापर्यंत २२६१ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी एकट्या त्र्यंबकेश्वर शहरात ८५५ रुग्ण होते. आतापर्यंत २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे, तर ३०७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे तालुका काेरोनामुक्तीकडे वाटचाल करताना दिसून येत आहे.
इन्फो
दुकाने उघडून काय उपयोग?
त्र्यंबकेश्वर शहराचे अर्थचक्र हे मंदिरावर अवलंबून आहे. परंतु मंदिर उघडण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याने दुकाने उघडून काय उपयोग, असा सवाल व्यावसायिकांकडून केला जात आहे. दरम्यान, पालिकेकडे अद्याप जिल्हा प्रशासनाचा आदेश प्राप्त न झाल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी असेल, असे मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून नागरिक व पालिका यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.