नाशिक : बेकायदेशीर बांधकामांना अभय देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यां विरुद्ध आवाज उठविणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़२६) पहाटेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरच्या पाचआळी परिसरात घडली़ या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव विशाल सुधाकर गंगापुत्र असे असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़गंगापुत्र हे माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे तालुका अध्यक्ष असून, त्यांनी बेकायदा बांधकाम तसेच नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध पुरावे गोळा केले होते़ तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशीची मागणीही माहिती अधिकार कायद्यान्वये केली होती़ या अर्जावर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही़ विशेष म्हणजे अनधिकृत बांधकांना अभय न देण्याचे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे गंगापुत्र यांचे म्हणणे आहे़या अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन गंगापुत्र हे सोमवापासून (दि़२६) पाथर्डी फाटा येथे आमरण उपोषणास बसणार होते़ त्यासाठी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास घराबाहेर पडत असताना काही गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला़ त्यांच्या पाठीवर चॉपरने वार करण्यात आले असून, गुंडांनी त्यांच्याकडील पेनड्राईव्ह, दोन सीडी, फाईल असे पुराव्यांचे दस्तऐवज चोरून नेले आहेत़ या हल्ल्याप्रसंगी आरडाओरड केल्याने कुटुंबीय बाहेर येताच गुंड फरार झाले़ या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन गंगापुत्र यांचा जबाब नोंदवून घेतला आहे़ (प्रतिनिधी)
त्र्यंबकच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: September 27, 2016 01:41 IST