नाशिक : सिंहस्थ पर्वणीसाठी येणाऱ्या वृद्ध भाविकांचे हाल होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी त्यांच्या सेवेसाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मोफत मिनी बससेवा सुरू केली होती़ या सेवेचा रविवारी सुमारे २५ हजार वृद्धांसह अपंगांनी लाभ घेतल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांनी दिली आहे़ तिसऱ्या पर्वणीसाठीही ही सुविधा सुरू राहणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़सिंहस्थ पर्वणीकाळात स्नानासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये वृद्धांची संख्या लक्षणीय असते़ वयोपरत्वे त्यांना पायी चालणे शक्य नसते़ त्याबरोबरच अपंग व्यक्तींचेही हाल होतात, प्रसंगी अपघात होण्याचीही शक्यता असते़ त्यामुळे या काळात येणारे वृद्ध व अपंग भाविकांना पर्वणीचे स्रान सुलभपणे करता यावे यासाठी पोलिसांनी ही सेवा सुरू केली होती़ यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या शाळांच्या संचालकांशी चर्चा केली़शाळा संचालकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून भाविकांच्या सेवेस प्राधान्य देत खारीचा वाटा उचलला़ त्यांनी विनामूल्य या बसेस उपलब्ध करून दिल्या़ त्यात पोलीस प्रशासनाने डिझेल टाकून दिवसभरात सुमारे २५ हजार भाविकांची वाहतूक केली़ या मिनी बसेस प्रामुख्याने निलगिरी बाग, के. के.वाघ महाविद्यालय, नाशिकरोड, डोंगरे वसतिगृह या अंतर्गत वाहनतळांवर ठेवण्यात आल्या होत्या़ या ठिकाणाहून वृद्ध व अपंग व्यक्तींना स्नानासाठी रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सोडण्यात येत होते़ या सेवेबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे़ (प्रतिनिधी)
25 हजार वृद्धांना घडला पोलीस बससेवेचा प्रवास
By admin | Updated: September 15, 2015 22:37 IST